पुणे सातारा रस्त्यावर पंक्चरवाल्यांचा प्रवाशांना फसविण्याचा कारभार सुरुच
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 3 : मोटारीच्या चाकातील हवा कमी झाल्याचे सांगून प्रवाशांना फसवून पंक्चर काढण्यास भाग पाडण्याचे प्रकार पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परीसरात सुरु आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या प्रकारे प्रवाशांची फसवणूक होत आहे. मात्र तरीही सबंधित पंक्चर दुकान दारांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल नागरीक विचारत आहेत.
पुणे सातारा रस्त्यावर विशेषतः सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या सुमारास पंक्चर दुकानातील दोघे जण दुचाकीवर हेल्मेट घालून फिरतात. यावेळी साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या विशेषतः परप्रांतीय वाहन हेरले जाते. त्या वाहनाच्या जवळ जाऊन हाताने मोटारीच्या चाकातील हवा कमी असल्याचे सांगून ते दुचाकीस्वार निघून जातात. त्यानुसार हवा कमी असल्याचे सांगितल्याने मोटर चालक ताबड़तोब शेजारी असलेल्या पंक्चर दुकानात गाडी नेऊन हवा तपासण्यास सांगतात. मग तेथे अनेक पंक्चर काढून सबंधित मोटर चालकाला अक्षरशः लुबाडले जाते.
गेल्या अनेक वर्षापासून पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाका परीसरात हा प्रकार सुरु आहे. मात्र अद्याप त्या पंक्चर दुकान चालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना कोणाचा वरदहस्त आहे की काय? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.