मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट’ अभियान
पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून १०० टक्के मतदान करावे, यासाठी ‘वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट’ हे मतदान जागृती अभियान हाती घेत समाजातील ज्येष्ठ मंडळींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानाचे प्रमुख यशवंत घारपुरे, मुकुंद पुराणिक, महाबळेश्वर देशपांडे, मुकुंद क्षीरसागर, हेतल बारोट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या अभियानात हेमंत कुमार, सीए सतीश घाटपांडे, रवींद्र महाजन, एस. एन. चंद्रचूड, बी. आर. देशपांडे, हरीश रूनवाल, हेमंत पांचाळ, सतीश घाटपांडे आदी सदस्य कार्यरत आहेत.
यशवंत घारपुरे म्हणाले, “मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे प्रमुख माध्यम आहे. मात्र, मतदार मतदानाच्या दिवशी सुटी घेऊन फिरायला जातात. लागून सुट्ट्या आल्या असल्या, तरी लोकांनी मतदान करून मग फिरायला गेले पाहिजे.”
“मतदान जागृती करणारी एक लाख पत्रके वाटप करत आहोत. तसेच हजारो बिल्ले तयार केले असून, पत्रके व बिल्ल्यांद्वारे समाजातील विविध घटकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप, तरुणाईचे कट्टे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी, तसेच पुणे स्टेशन येथील रेल्वे स्थानक व बस स्टॅन्ड परिसरात ही पत्रके वाटली जात आहेत. फेसबुक व व्हाट्सअप या सोशल माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. साधारपणे तीन ते चार लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू, असा विश्वास वाटतो,” असेही यशवंत घारपुरे यांनी नमूद केले.