मतदार आणि कार्यकर्त्यांपुढे ‘उन्हा’चे आव्हान

0

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे

पुणे, ता. 6 : बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असून आता 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र सध्या वातावरणात प्रचंड उन्हाचा कडाका आहे. या कडक उन्हात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे, हे कार्यकर्त्यांसाठी आव्हान असणार आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील लढत ही देशात लक्षवेधी झाली आहे. त्याचे कारण म्हणजे पवार घराण्यातील नणंद आणि भावजयीमध्ये ही लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या आहेत. त्यामुळे या वेळी बारामतीचा गड कोण जिंकणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

गेल्या महीनाभरात बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचारही जोरात झालेला आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभा झाल्या आहेत. या एक महिन्याच्या कालावधीत अनेक आरोप- प्रत्यारोप झाले. भावनिक आवाहने झाली. कधी नव्हे ते पवार कुटुंबातील अनेक सदस्य यावेळी प्रचारात उतरलेले पाहायला मिळाले. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे म्हणजेच महाविकास आघाडीला एक सहानुभुतीची लाट होती. मात्र एक महिन्याच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही सहानभूतीची लाट कमी करण्यात काही प्रमाणात महायुतीला यश आले. त्यामुळे सुरुवातीला अगदी एकतर्फी होईल, असे वाटत असलेली लढत अंतिम टप्प्यात अत्यंत चुरशिची होईल, हे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही बाजूने आपापल्या परीने आपली भूमिका मतदारापर्यन्त पोचवली आहे. आता मतदार 7 मेला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र या निवडणुकीत ऊन मोठा भाव खाणार असे दिसून येत आहे. कारण उन्हाचा प्रचंड चटका जाणवतो आहे. या कडक उन्हात कार्यकर्त्यांना मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे हे मोठे आवाहन असणार आहे. कारण त्यावरच मतदानाची टक्केवारी आणि उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. त्याची 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!