प्रवाशांची फसवणूक करण्याचा पंक्चर टोळीचा कार्यक्रम सुरुच

0

या पंक्चर टोळीचा पर्दाफाश करणे हे पोलिसांपुढे आव्हान आहे.

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर,
ता. 26 : पुणे सातारा रस्त्यावर प्रवाशांना वाहनांच्या चाकातील हवा कमी झाल्याचे सांगून फसवणूक करण्याचा पंक्चर टोळीचा कार्यक्रम सुरुच आहे. आपली फसवणूक झाली हे लक्षात येत नसल्याने त्यांच्याविरोधात कोणी तक्रार करत नाही. अन त्यांच्याविरोधात तक्रार नाही म्हणून आम्ही कारवाई करत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र रोज अनेक प्रवाशांना फसवणाऱ्या या पंक्चर टोळीचा पर्दाफाश करणे हे पोलिसांपुढे आव्हान आहे.

पुणे सातारा रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून एक पंक्चर टोळी कार्यरत आहे. त्यातील दोघे जण दुचाकीवर सज्ज असतात. सकाळच्या वेळी पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारे खासकरुन परप्रांतीय वाहन हेरतात. रस्त्यावरील पंक्चर दुकानांच्या अगोदर काही अंतरावर त्या वाहनाजवळ दुचाकी न्यायची आणि टायरमध्ये हवा कमी असल्याचे सांगून निघून जायचे. त्याबरोबर ताबडतोब सबंधित वाहन चालक गाडी पुढे अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या पंक्चर दुकानात नेतो आणि चाकातील हवा तपासण्यास सांगतात. त्यावेळी त्या चाकात नसलेल्या अनेक पंक्चर काढल्या जातात. ते पाहून बरे झाले त्या दुचाकीस्वारांनी वेळेवर सांगितले. अशी भावना त्या प्रवाशांची होते. अन नसलेल्या पंक्चर काढल्याचे पैसे देऊन ते निघून जातात. मात्र आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

रविवारी सकाळीही पुणे सातारा रस्त्यावर ससेवाडी उड्डाणपूल संपल्यावर मोटरगाडी बाजूला घेऊन एक प्रवासी चाकात हवा आहे की नाही हे पाहत होते. यावेळी त्यांना जाऊन विचारले असता कोणीतरी दोघे जण दुचाकी वरुन आले त्यांनी चाकात हवा कमी असल्याचे सांगितले. मात्र गाडीच्या चाकात हवा व्यवस्थित होती. अशा प्रकारे पुणे सातारा रस्त्यावरील काही पंक्चर दुकानवाल्यांकडून प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. मात्र आपली फसवणूक झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात येत नाही. तर त्यांच्याविरोधात तक्रार येत नसल्याने आम्ही कारवाई करत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पंक्चर टोळीचा प्रवाशांची फसवणूक करण्याचा कार्यक्रम सुरुच आहे. मात्र वेळीच लक्ष ठेवून या पंक्चर टोळीचा पर्दाफाश करणे, हे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!