शिवापूरातील उपबाजारासाठी आझाद मैदानात उपोषण

1

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर,
ता. 22 : सुमारे 40 वर्षापूर्वी शिवापूर (ता. हवेली) येथे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार सुरु करण्यासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. मात्र अजूनही त्याठिकाणी बाजार समितीला उपबाजार सुरु करण्यास मुहूर्त मिळालेला नाही. त्यासाठी अखेर शिवापूर येथील शेतकरी अनंत गुजर यांनी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. बाजार समितीने लवकरात लवकर याठिकाणी उपबाजार सुरु करण्याची कार्यवाही करावी, या मागणीसाठी गुजर 23 सप्टेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करणार आहेत.

याबाबत गुजर यांनी पत्रकारांना माहिती दिली. 1985 साली हवेली तालुक्यातील शिवापूर येथील पाच एकर जमीन उपबाजार बांधण्यासाठी बाजार समितीला देण्यात आली. मात्र अनेक वर्ष होऊनही बाजार समितीने याठिकाणी उपबाजार सुरु केला नाही. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी यांनी बाजार समितीला शर्तभंग नोटीस बजावून ही जमीन परत का घेऊ नये, असे पत्र पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवले. त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक निर्णय शासन दरबारी पाठवला. मात्र त्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे शिवापूर येथे उपबाजार सुरु करण्याचा विषय पुढे सरकत नाही. उपबाजाराची फाइल महसूल मंत्र्यांच्या टेबलवर आहे. मात्र बाजार समितीच्या उदासीनतेमुळे ही फाइल पुढे सरकत नाही, असे गुजर यांनी यावेळी सांगितले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे हा उपबाजार सुरु करण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात 23 सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याचे गुजर यांनी सांगितले.

“शिवापूर परीसर झपाट्याने विकसित होत आहे. मात्र त्याचवेळी या भागातील आमच्या शेतकरी बांधवांची शेतमाल विक्रीसाठी मोठी अडचण होत आहे. याठिकाणी उपबाजार सुरु झाल्यास शेतकरी वर्गाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे बाजार समितीने सदर ठिकाणी लवकरात लवकर उपबाजार सुरु करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा शिवगंगा खोऱ्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच गाळे राखीव ठेवावेत, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी मी उपोषण करत आहे.”
-अनंत गुजर, शिवापूर येथील शेतकरी

1 thought on “शिवापूरातील उपबाजारासाठी आझाद मैदानात उपोषण

  1. आपल्या शिवगंगा खोऱ्यातील भागातिल घडणाऱ्या घटनांची माहिती निपक्ष, खरी, पूर्णपणे शहानिशा करून माहिती देत आहात.
    आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद
    🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!