पोलिस चौकीत घुसून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण
राजगड पोलिसात एक जणावर गुन्हा दाखल
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 13 : येथील खेड-शिवापूर पोलिस चौकीत विनाकारण शिरुन एक जणाने कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात खुर्ची घातली. तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार रविवारी (ता.12) घडला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी रोहन गौतम साळवे (रा. कल्याण, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. तर याप्रकरणी पोलिस हवलदार राहुल कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हे हे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर पोलिस दुरक्षेत्रात कर्तव्यावर होते. यावेळी रोहन साळवे हा अचानक चौकीमध्ये शिरला. यावेळी त्याठिकाणची खुर्ची उचलून कोल्हे ज्या संगणकावर काम करत होते त्या संगणकावर फेकली. तसेच कोल्हे यांच्या डोक्यात खुर्ची घालून त्यांना दुखापत केली. तसेच सुमारे 50 हजार रूपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.
याप्रकरणी कोल्हे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साळवे याच्यावर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.