वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार
चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 29 : आकर्षक आणि वेगवेगळी वेशभूषा करून आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी, कधी मराठमोळा बाणा तर कधी हिंदीतील गीतांवर सादर होणारी एका वरचढ एक धडाकेबाज नृत्ये, त्याला उपस्थित पालक आणि शिक्षक वर्गाची मिळणारी दाद… अशा या गीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
निमित्त होते, गाऊडदरा (ता. हवेली) येथील चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे. खेड-शिवापूर-बाग येथील नक्षत्र बैंक्वेट हॉल मध्ये हे स्नेह संमेलन पार पडले.
सायंकाळी पाच वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या अगदी लहान वर्गापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर लक्षवेधी नृत्य सादर केली.
भव्य रंगमंच, त्यावर पाठीमागे लावलेला भव्य स्क्रीन आणि स्पीकरवर वाजणाऱ्या गीतांवर आपली नृत्याची कला सादर करताना विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थित पालक आणि शिक्षक वर्गाचीही मोठी दाद मिळत होती. रात्री उशीरापर्यंत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सुरु होता.
यावेळी शिवापूर ग्रामपंचायत आणि नवयुग तरुण मंडळ, शिवापूर यांच्यातर्फे चाटे स्कूलचे प्रा. फुलचंद चाटे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय अण्णा दिघे, उपसरपंच राजाभाऊ सट्टे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खकड़वासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, गाऊडदरा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत गाडे, कैलास ओंबळे, नितिन सुर्वे आदी यावेळी उपस्थित होते.