Mamta Kulkarni : 7 दिवसांत असं काय झालं? या 5 कारणांमुळे गेलं ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर पद
मुंबई : अभिनेत्री ममता कुलकर्णीकडून महामंडलेश्वर हे पद काढून टाकण्यात आले आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये तिच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. अलीकडेच ममता कुलकर्णीने सन्यास दीक्षा घेतली आणि ती किन्नर आखाड्यात सामील झाली. महाकुंभात तिला महामंडलेश्वर ही पदवी मिळाली होती. मात्र, तिच्या प्रवेशापासूनच किन्नर आखाड्यात मतभेद पाहायला मिळाले. किन्नर आखाड्यातच ममता कुलकर्णी यांच्याबाबत मतभेद झाले होते. मात्र, आता हा गोंधळ संपला आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजयदास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले आहे. इतकंच नाही, तर ममताला ही पदवी देणाऱ्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आखाड्याने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात ममता कुलकर्णी यांच्यावर घेण्यात आलेल्या या कारवाईचे कारण सांगण्यात आले आहे. आता प्रश्न असा आहे की, ममता कुलकर्णीसंबंधी अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांनी किन्नर आखाड्याला तिच्याविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडले? अवघ्या 7 दिवसांत ममताकडून हे पद का हिसकावण्यात आले? जाणून घेऊया या कारवाईमागील कारण काय आहे.
पहिली गोष्ट: ममता कुलकर्णीला थेट महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली, ही गोष्ट किन्नर आखाड्याला पटली नाही. ममता कुलकर्णीने आधी संन्यासाच्या दिशेने वाटचाल करायला हवी होती, तिने संन्यास घ्यायला हवा होता. त्यानंतर जर तिला ही पदवी दिली असती तर कदाचित काही अडचण आली नसती. किन्नर आखाड्याने जारी केलेल्या निवेदनात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
दुसरी गोष्ट: ममता कुलकर्णी ही फिल्मी दुनियेतून आली आहे. फिल्मी दुनियेतील असणं हे काही मोठं कारण नव्हतं. खरे कारण म्हणजे तिचा चित्रपटांमधील बोल्ड अवतार. तिने 90 च्या दशकात टॉपलेस फोटोशूट केले होते. या गोष्टीला किन्नर आखाड्यातील अनेकांचा आक्षेप होता.
तिसरी गोष्ट: ममता कुलकर्णीचे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले होते. ममताने फिल्मी जग सोडून ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप होत आहे. एकदा तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. तिच्यावर देशद्रोहाचे आरोप असून अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
चौथी गोष्ट: आखाड्यांचा नियम असा आहे की जो महामंडलेश्वर होईल तो संन्यासी असावा आणि त्याचे मुंडन केलेले असावे. मुंडन संस्कार केल्याशिवाय संन्यास वैध नाही. ममता कुलकर्णी साधू नव्हती किंवा तिने मुंडन संस्कारही केले नव्हते.
पाचवी गोष्ट: किन्नर आखाड्याच्या नियमानुसार आखाड्यातील संन्यासींना गळ्यात वैजयंती माळ घालावी लागते. मात्र, ममता कुलकर्णीने रुद्राक्षाची माळ घातली. ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर ही पदवी किन्नर आखाड्याच्या नियमानुसार नव्हती.
या सर्व गोष्टी अशा आहेत, ज्यामुळे आखाड्याच्या सदस्यांमध्ये तेढ निर्माण झाली होती. ममता कुलकर्णीच्या पार्श्वभूमीमुळे तिला महामंडलेश्वर ही पदवी देणे किन्नर आखाड्यातील एका मोठ्या वर्गाला पटले नव्हते. यामुळेच आज किन्नर आखाड्याच्या संस्थापकाने ममता कुलकर्णी तसेच आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी 2015-16 उज्जैन कुंभमध्ये महामंडलेश्वर झाल्या होत्या.