सोलापूरांसाठी आनंदाची बातमी
हडपसर-लातूर-हडपसर एक्स्प्रेसने सोलापूरकरांना पुणे गाठणे होणार शक्य
पुणेफास्ट24 न्यूज:
सोलापूर, ता१६: नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणानिमित्त सोलापूरहून पुणे येथे नियमित जाणारे व्यावसायिक, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सोलापूरमधून सकाळी सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसनंतर सोलापूरमधून पुण्याला रेल्वे कमी आहेत. पण, सोलापूरवरून कुर्डूवाडीला एसटीने जाऊन लातूर-हडपसर (पुणे) दिवाळी विशेष एक्स्प्रेसने सोलापूरकरांना पुणे अन् लातूर गाठणे शक्य झाले आहे.
दरम्यान, सोलापूरमधून नोकरी, शिक्षणासाठी पुणे येथे जाणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र सोयीच्या वेळेला रेल्वे नव्हती. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी सेवेचा आधार घ्यावा लागत असेे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने हडपसर-लातूर पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस कुर्डूवाडीहून धावणार असल्याने याचा फायदा सोलापूरमधून पुणे अन् लातूरला जाणार्या प्रवाशांना होणार आहे. तसेच बार्शी, उस्मानाबाद आणि लातूरला जाण्यासाठी कुर्डूवाडी येथून प्रवाशांना बसता येणार आहे. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर नियमित होऊ शकते. लातूर व हडपसरहुन 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत प्रती सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार धावणार आहे. लातूर-हडपसर ही लातूर येथून सकाळी 09.30 वाजता सुटेल कुर्डूवाडीला दुपारी 12.30 येईल तर हडपसरला सायंकाळी 03.40 वाजता पोहोचेल. हडपसर-लातूर ही हडपसर येथून सायंकाळी 04.05 वाजता सुटेल. कुर्डूवाडीला 6.30 येईल आणि लातूरला रात्री 9.20 वाजता पोहचेल.
18 डब्यांची रेल्वे, इथे आहे थांबा
हडपसर-लातूर-हडपसर रेल्वेला अठरा डबे आहेत. त्यामुळे दीड हजार ते अठराशे प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतील. तर हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर, दौंड हे थांबे असतील. चार जनरल, आठ स्लीपर, दोन वातानुकूलित थ्री टियर, एक वातानुकूलित टू टियर, एक प्रथम श्रेणी वातानुकूलित व दोन एसएलआर असे एकूण 18 आयसीएफ डबे आहेत.
दिवाळी सणात चांगला फायदा होईल. बार्शी, धाराशिव, लातूर या भागातील प्रवाशांसाठी चांगली गाडी आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताच पुढे ही गाडी कायमस्वरुपी राहील.
– शामसुदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे, रेल्वे सल्लागार समिती.
– हडपसर-लातूर ही विशेष रेल्वे सुरु होत आहे. त्यामुळे लातूर, बार्शी, धाराशिव येथील प्रवाशांची चांगली सोय झाली. यामुळे रेल्वे प्रशासनाने ही गाडी कायमस्वरुपती सुरु ठेवावी.
– कनिष्क बोकेफोडे, रेल्वे अभ्यासक